डोंबिवली: आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेकडे जाणा-या तपोवन एक्स्प्रेसवर दगड मारुन, त्यानंतर रस्त्यावर उतरुन दुचाकीने जाणा-या दोन अज्ञात इसमांवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रेल्वे पोलीस दलाचे टिटवाळा येथे कार्यरत असलेले प्रधान आरक्षक संजय यादव यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी व्हिडिओची शहानीशा केली. त्यात आढळलेल्या दोन दुचाक्यांचे नंबरांवरून दुचाक्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. आणि आता त्या दोन फरार युवकांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
मच्छींद्र चव्हाण, लोहमार्ग सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांनी त्या घटनेची गंभीर नोंद घेत, तातडीने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीसांना यासंदर्भात घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दिले. तसेच सापळा लावण्यास सांगितले. त्यानूसार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजित बारटक्कटे यांनी पोलीस उपनिरिक्षक पंढरीनाथ भोसले यांच्याकडे तपास सोपवत एक पथक तैनात केले.
आधी व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली असून त्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर कारवाईने वेग घेतला. तपोवन एक्स्प्रेसवर दगड मारल्यानंतर ते दोघे युवक रस्त्यावर येत दुचाकीवरून जातांना नंबरप्लेट, वाहनांच्या रंगासहीत व्हिडिओत कैद झाले. त्यानूसार त्याच नंबराच्या लाल व नीळया रंगाच्या दोन दुचाक्या मोहने चौकीजवळून पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्या दुचाक्या कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठेवल्या आहेत. त्यासंदर्भातील दोन आरोपि फरार असून प्राथमिक माहितीनूसार ते आंबिवली परिसरातच वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तपासाधिकारी भोसलेंसह पथकाचा तपास सुरु आहे.जीआरपीसह आरपीएफने केले गुन्हे दाखलदोन फरार आरोपिंवर वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणे, संगमताने गुन्हा करणे हे गुन्हे लोहमार्ग पोलीसांनी तर रेल्वे अॅक्टनूसार रेल्वे हद्दीत अनकिधृतपणे येणे, रेल्वे प्रवाशांना दुखापत करण्याचा प्रयत्न करणे अशा स्वरुपाचे गुन्हे आरपीएफच्या सांगण्यावरुन दाखल करण्यात आल्याची माहिती बारटक्के यांनी दिली.प्रवाशाच्या हाताला फटका मारल्याचा तक्रारीत उल्लेख नाही?ती लांबपल्याची गाडी आंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे फाटकानजीक धीमी होताच दरवाजात बसलेल्या एका प्रवाशाच्या हाताला फटका मारुन मोबाइलसदृश वस्तु लांबवण्यात आली असल्याचा प्रकारही व्हिडिओत कैद झाला आहे. परंतू तसे काही नेमके स्पष्ट होत नसल्याने तक्रारीमध्ये मात्र त्याचा सध्या तरी उल्लेख करण्यात आलेला नाही.