मीरा भाईंदरमधील सरस्वती वैद्यच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांना 36 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे 35 तुकडे सापडले आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक अहवालात ही बाब समोर आली आहे. मात्र, शरीराचा काही भाग गायब आहे की नाही, याचा अहवाल येणं बाकी आहे. या तुकड्यांचा डीएनए सरस्वती वैद्य यांच्या बहिणींशीही जुळला आहे. ही महिला तिचा 'लिव्ह-इन' पार्टनर मनोज सानेसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. आरोपीच्या फ्लॅटमधून पोलिसांना सापडलेले काही तुकडेही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज साने याने 3 जून रोजी रात्री 10 ते 12 च्या दरम्यान सरस्वती वैद्यची हत्या केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सुनियोजित खून होता कारण आरोपीने खुनाच्या काही महिन्यांपूर्वी मार्बल कटर मशीन खरेदी केले होते आणि त्यानंतर 4 जून रोजी ट्री कटर मशीन देखील खरेदी केली होती.
आरोपी मनोज साने याचे इतर अनेक महिलांशीही संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीच्या मोबाईलवरून इतर अनेक महिलांसोबतचे चॅट्स पोलिसांना मिळाले आहेत. यावरून मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांच्यात वारंवार भांडणं होत होती. मनोज साने हा अनेक डेटिंग एपवरही सक्रिय होता आणि या एपच्या माध्यमातून तो इतर महिलांशी चॅट करत असे, असे पुरावेही पोलिसांना आरोपीच्या मोबाईलवरून मिळाले आहेत.
मनोज साने याच्या मोबाईलवरून मिळालेल्या पुराव्यावरून तो सेक्स एडिक्ट होता आणि त्यामुळे त्याचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनोज सानेचे इतरही अनेक महिलांशी प्रेमसंबंध असल्याचा सरस्वतीला संशय असून यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांनी काही वर्षांपूर्वी तुंगारेश्वर मंदिरात लग्न केलं होतं आणि त्यानंतर मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये राहू लागले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपीने पहिल्यांदा मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या भिंतींवर खूप रक्त उडालं, त्यामुळे तो घाबरला. यानंतर, त्याने फ्लॅटच्या आत भिंतींवर वर्तमानपत्रे चिकटवली आणि नंतर शरीराचे तुकडे करण्यास सुरुवात केली. सरस्वतीच्या शरीराचे काही भाग रेल्वे रुळालगतच्या नाल्यात फेकल्याची कबुली आरोपीने चौकशीत दिली आहे. या माहितीनंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेसह पोलीस त्या भागांचा शोध घेण्यात गुंतले आहेत.
आरोपीच्या फ्लॅटमधून पोलिसांना एचआयव्हीची लागण झाल्यास खाण्यासाठी काही औषधेही सापडली आहेत. आरोपीचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. अशा परिस्थितीत मनोज साने एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची चर्चाही खरी असू शकते, मात्र वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आरोपीच्या फ्लॅटमधून एक बोर्ड मिळाला असून, त्यावर दहावीचे विषय लिहिलेले आहेत. सरस्वती वैद्य दहावीच्या परीक्षेची तयारी करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मीरा रोड खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 20 ते 25 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिल्याने हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, सानेने करवतीने शरीराचे तुकडे कापून प्रेशर कुकर आणि भांड्यात शिजवले. सरस्वतीचा मृत्यू 4 जून रोजी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र ही बाब 7 जून रोजी उघडकीस आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. news18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.