अहमदनगर/ राहुरी - पोलीस मागावर आहेत हे समजताच नगर जिल्ह्यातून 'तो' प्रसार झाला आणि उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाला. तेथे वेषांतर करून शेतमजूर म्हणून काम करू लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा शोधला. मात्र तोंडाला मास्क आणि वेषांतरमुळे एकवेळ पोलिसांनाही तो ओळखू येईना. त्याच्या उजव्या हातावर मात्र 'सायली' हे नाव गोंदलेले पोलिसांनी हेरले आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय कुलथे याला अखेर जेरबंद केले.श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे 6 एप्रिल रोजी आरोपींनी अपहरण करून त्यांचा खून केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख यांना अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर मिटके यांच्या पथकाने या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला जेरबंद केले. या गुन्ह्यातील चौथा आरोपी अक्षय कुलथे मात्र फरार होता. कुलथे हा उत्तरप्रदेशमधील चटिया (ता. बिनंदनकी जि.फत्तेपूर) येथे असल्याची माहिती उपाधिक्षक मिटके यांना समजली होती. त्यानंतर पथकाने चटिया या खेडेगावात कुलथे याचा शोध घेतला. त्याच्या उजव्या हातात प्रेयसीचे नाव गोंदलेले आहे ही बाब पोलिसांना माहिती होती. हिच ओळख पटवून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक शेळके, निलेशकुमार वाघ, नीरज बोकील, मधुकर शिंदे, राजेंद्रअरोळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस नाईक फुरकान शेख, शिवाजी खरात, रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे आदींनी पथकाने ही कारवाई केली.आरोपीची घेतली ट्रांजिट रिमांड कस्टडीअक्षय कुलथे याला उत्तरप्रदेश येथून पोलिसांनी अटक केल्यानंतर फत्तेपुर येथील जिल्हा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे त्याची ट्रांजिट रिमांड कस्टडी घेऊन त्याला नगर येथे आणण्यात आले. कुलथे याच्याविरोधात राहुरी, राहता व कोपरगाव पोलिस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.