कल्याण- काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात टीसी असल्याचे पावती बूक घेऊन दोन टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. त्याचे हावभाव पाहून रेल्वेतील अधिकृत टीसी आणि त्यांच्या सहकऱ्याला स्टेशनवरुन वावरत असताना त्या दोन टीसींचा संशय आल्याने दोन्ही बोगस टीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
रोहिदास गायकवाड आणि संदीप पवार अशी अटक आरोपींची नाव असून कसारा रेल्वे स्थानकात हे दोघे शनिवारी सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सूमारास फलाट क्रमांक 4 वरील रेल्वे कॅन्टीन समोर प्रवाशांचे तिकीट तपासत होते. यावेळेला आलेल्या गाडीमध्ये रेल्वे कर्मचारी व टीसी संतोष त्रिपाठी आणि विष्णू सांबरे यांनी या दोघांना हटकले असता दोघांनी बनावट ओळखपत्र दाखवून ते रेल्वेमध्ये टीसी व सरकारी नोकर असल्याची बतावणी करू लागले. मात्र त्यांच्या बोलण्यावरून तिवारी यांना संशय आला म्हणून ही बाब त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळवली.
तात्काळ तेथे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोहोचून रेल्वे विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेत दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली. यामध्ये त्यांच्याकडे रेल्वेचे दोन बनावट ओळखपत्र व दोन मोबाईल फोन मिळून आले. त्यानंतर ही पोलिसांनी त्याला विचारणा केली, असता ते दोघे पोलिसांना अजूनही आम्ही खरे टी.सी असल्याचं पोलिसांना सांगत असल्याने पोलीस चक्रावले आहे. तसेच यांना टी.सी.चे आयकार्ड कोणी दिले याचा शोध लावत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.