गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात पत्नीने आपल्या पतीच्या 'अपहरणाचा' कट रचल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पत्नीने पतीला या कटात सहभागी करून घेतले. तर दुसरीकडे पतीच्या अपहरणाचा आरोप करून बिल्डरांकडून तिने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पती ओळख बदलून लपून राहत होता.
हरियाणातील पानिपत येथून अपहरण झालेल्या पतीची सुखरूप सुटका करून उत्तर प्रदेशच्या इंदिरापुरम पोलिसांनी संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी राजेशने सांगितले की, सेक्टर 1 वसुंधरा येथील फ्लॅटबाबत बिल्डरांशी वाद सुरू होता, त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर वेळेवर हप्ता भरला नाही. त्यामुळे बँकेने फ्लॅट सील केला. माझ्यावर बँकेचे कर्ज असल्याने माझी पत्नी पुष्पा देवी हिच्या सांगण्यावरून मला घरातून गायब करून बिल्डरांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचा कट रचण्यात आला.
प्लॅननुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्या पत्नीला मी जात असलेल्या जागेबद्दल सांगून निघून गेलो, त्यानंतर पत्नीने बिल्डरांवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करून कारवाईची भीती दाखवून पैसे मागण्याच्या उद्देशाने मार्च 2022 मध्ये पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात माझे पत्नीशी बोलणे झाले असता विरोधी बिल्डरांनी पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून बिल्डरांकडून पैशांची मागणी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
अपहृत राजेश मार्च 2022 पासून ओळख लपवून विविध ठिकाणी काम करत होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो पानिपत येथील कसबा समलखा येथे इलेक्ट्रिक स्कूटर एजन्सीमध्ये काम करत होता. अपहृत राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर आरोपी राजेश व त्याची पत्नी पुष्पा यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.