- नरेश डोंगरे
नागपूर : पोलीस आणि चोरट्यांचा 'लपंडाव' नेहमीच सुरू असतो. वारंवार पोलिसांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करून पोलीस मात देत असतात. मात्र, आधी आंध्रात आणि नंतर महाराष्ट्रात चोरी करून लगेच मध्यप्रदेशात पळालेल्या चोरट्यांचा अवघ्या काही तासातच शोध पोलीस लावत असतील आणि परप्रांतात जाऊन त्यांना मुद्देमालासह गजाआडही करीत असेल तर तोे नक्कीच प्रशंसेचा विषय ठरावा. चोरटे कितीही सराईत असले तरी पोलीसही आता कसे टॅक्नोसॅव्ही झाले आहे, त्याची ग्वाही देणारे आणि तपासाचे 'मॉडेल' ठरू पाहणारे हे प्रकरण सध्या रेल्वेच नव्हे तर अवघ्या पोलीस दलातच चर्चेला आले आहे.
घटना शुक्रवारी ११ ऑगस्टची आहे. ट्रेन नंबर १६०३१ अंदमान एक्सप्रेस नागपूर स्थानाकावर दुपारी ३ च्या सुमारास थांबली होती. त्यातील एका प्रवाशाचा दीड लाखांचा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. बॅग धारकाच्या लक्षात चोरी झाल्याची बाब आली तेव्हा ट्रेन नागपूरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमिटर दूर आली होती. त्यामुळे आमला (मध्यप्रदेश) रेल्वे पोलिसांकडे त्यांनी सायंकाळी चोरीची तक्रार नोंदविली. आमला पोलिसांनी तो एफआयआर नागपूर रेल्वे पोलिसांकडे पाठविला. पोलिसांनी लगेच फलाटावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. संशयितांचे फुटेज रेल्वे पोलिसांच्या व्हॉटस्अप ग्रुपवर पाठविण्यात आले. काही वेळेतच आंध्र प्रदेशमधील विजयवाडा पोलिसांनी याच चोरट्यांनी तेथेही गुरूवारी चोरी केल्याची माहिती रिप्लायच्या रुपाने दिली. त्यामुळे तेथून चोरट्यांचे मोबाईल नंबर शोधण्यात आले. त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते भोपाळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेगाडीत दिसले.
नागपूरहून भोपाळला जाण्यास पाच ते सात तास लागणार, हे लक्षात येताच जीआरपी निरीक्षक मनीषा काशिद यांनी त्यांच्या ईटारसीला तपासासाठी गेलेल्या पथकाला तिकडूनच भोपाळला रवाना केले. ईकडे रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपींचे पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री भोपाळमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांचा माग काढला. ते एका लॉजकडे जात असल्याचे दिसताच नागपूर पोलीस त्या लॉजवर धडकले. दरम्यान, मोठा ऐवज हाती लागल्याने सेलिब्रेशनच्या तयारीत असतानाच रेल्वे पोलिसांनी त्या चोरट्यांच्या सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. शनिवारी त्यांना घेऊन पोलीस रात्री नागपुरात पोहचले. आज त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. निजाम नजाकत शेख (वय २७), सादिक रईस शेख (वय २५) आणि परवेज अयूब शेख (वय २७) अशी या चोरट्यांची नावे आहेत. ते मुरादाबाद, (यूपी) मधील रहिवासी आहेत.
आंतरराष्ट्रीय टोळीचे सदस्य
हे सर्व आंतरराष्ट्रीय टोळीतील अट्टल चोरटे आहेत. एका प्रांतात चोरी करून, लगेच दुुसऱ्या प्रांतात पळून जायचे. तेथे हात मारून नंतर तिसऱ्या प्रांतात पळायचे, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नाही. मात्र, नागपुरात चोरी केल्यानंतर तीन तास उशिरा तक्रार मिळूनही रेल्वेचे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनीषा काशिद यांनी अत्यंत तत्परता दाखवत पोलीस कर्मचारी अमोल हिंगणे, पुष्पराज मिश्रा, सतीश बुुरडे आणि प्रवीण खवसे यांच्या मदतीने काही तासांतच भोपाळमध्ये जाऊन त्यांच्या मुसक्या बांधल्या. तत्पर तपासाचा उत्तम नमूना ठरलेले हे प्रकरण सर्वत्र चर्चेला आले आहे.