गुरुग्राम - कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला. एका मद्यधुंद इन्स्पेक्टरने भर रस्त्यात आपल्या एका मित्राबरोबर डान्स केला. शॉर्ट आणि स्लीव्हलेस टीशर्ट घातलेला हा पोलिस इन्स्पेक्टर मित्राबरोबर सुमारे अर्धा तास बेधुंद होऊन रस्त्यावर नाचत होता. त्याने आपली फॉर्चुनर कार रस्त्याच्या मधोमध उभी केली होती आणि त्यावर मोठ्या आवाजात म्युझिक लावण्यात आलेले होते. हा प्रकार सुरू असताना काही स्थानिक व्यावसायिक आणि वाहन चालकांनी पुढे होऊन या पोलिस अधिकाऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत आपण रस्त्यावर डान्स करू असे त्याने दरडावले. पोलिसाच्या या कृत्यामुळे अर्धातास ट्रॅफिकचा खोळंबा होऊन वाहनांच्या गांला लागल्या होत्या. अखेर काही वेळाने स्थानिक पोलिसांचे गस्तिपथक तेथे पोहोचले. त्यांनी या इन्स्पेक्टरला समजावण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण मद्यधुंदावस्थेत असलेल्या या इन्स्पेक्टरने त्यांच्याशीही हुज्जत घातली. अखेर पोलिसांच्या पथकाने हा इन्स्पेक्टर आणि त्याच्या मित्राला पकडून आपल्या जीपमध्ये बसवले आणि पोलिस ठाण्यात नेले. आरोपी पोलिस अधिकाऱ्याची ओळख नुहू जिल्ह्यातील क्राइम युनिटचा प्रमुख म्हणून झाली आहे. तो गुरुग्राममधील सिव्हिल लाइन्स परिसरात राहत असल्याचेही समोर आले आहे.
टल्ली पोलिस इन्स्पेक्टरचा रस्त्यावर डान्स, वाहतुकीचा झाला खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 8:51 AM