मुंबई - माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या फाऊंडेशनच्यावतीने दिल्या जाणाऱ्या 'पोलीस जीवन गौरव' पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. माजी पोलीस महासंचालक वसंत केशवराव सराफ यांना हा पुरस्कार देण्यात येणार असून सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त माधव प्रधान, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक शामराव राऊत यांनाही फाऊंडेशनच्यावतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार वसंत सराफ यांना देण्यात येणार असून एक लाख पन्नास हजार रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एक लाख ३१ हजारांच्या पुरस्काराचे मानकरी माधव प्रधान तर एक लाख अकरा हजारच्या पुरस्काराचे मानकरी शामराव राऊत हे ठरले असल्याची माहिती अरविंद इनामदार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यंदा २६ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्याला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती उपस्थित राहणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.
पोलीस सेवेत असताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा अरविंद इनामदार यांच्या फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जातो. तीन दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या पुरस्कारात समावेश असतो.