एका पोलीस उपनिरीक्षकाच्या (Police sub-inspector) घटस्फोटाचं (Divorce) मनोरंजक प्रकरण कौटुंबिक न्यायालयापुढं (Family Court) आलं आहे. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आपल्या पत्नीबाबत धक्कादायक गोष्टी उघड झाल्याने या पोलीस उपनिरीक्षकाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला आता त्याच्या पत्नीपासून सुटका हवीये. यासाठी त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतचं वृत्त नई दुनियानं दिलं आहे.
पोलीस उपनिरीक्षकाने ओएलएक्सवर वापरलेल्या १० कारच्या विक्रीची जाहिरात पाहिली. त्यालाही कार खरेदी करायची होती. उपनिरीक्षकाने ती कार पाहण्यासाठी ग्वाल्हेरमधलं डीडीनगर गाठलं. कार बघायला आला तेव्हा कोणीतरी कार बाहेर नेली होती. यामुळे तो कार पाहू शकला नाही. मात्र, त्या घरी त्याची एका तरुणीशी भेट झाली. उपनिरीक्षक निघून जात असताना मुलीने त्यांचा मोबाईल नंबर घेतला. गाडी परत आल्यावर तुम्हाला परत बोलावेन असं सांगितलं.
दोन दिवसांनी मुलीचा मेसेज उपनिरीक्षकाच्या मोबाईलवर आला. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. वारंवार मेसेज आणि फोन दोघांमध्ये होऊ लागले. काही दिवसांनी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०१९ मध्ये दोघांनी आर्य समाजात लग्न केलं. मात्र, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर आपल्या पत्नीबाबत उपनिरीक्षकाला जे काही समजलं त्याचा त्याला फार मोठा धक्का बसला. त्याची पत्नी आधीच विवाहित असल्याचं त्याला समजलं. एवढंच नाही तर तिला तिच्या पहिल्या पतीपासून एक मूलही आहे. लग्नाआधी तिने या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या. उपनिरीक्षकाने तिला याचा जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. तिचा पहिला पती सैन्यात होता. घरात कोणी नसताना पत्नीने सर्व सामान घेऊन घरातून पळ काढला.
उपनिरीक्षकाने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज सादर केला आहे. उपनिरीक्षक म्हणाला, ‘ त्या मुलीनी तिचं आडनाव बदललं होतं. मला वाटलं की ती गरीब घरातील मुलगी आहे त्यामुळे घरही चांगलं सांभाळेल. प्रेम विवाह होण्याआधी मला चांगल्या घराण्यातील मुलींची स्थळं आली होती पण मी ती नाकारली. पण पुढे बायको अशी फसवणूक करेल, हे अपेक्षित नव्हतं.’ आता पत्नीने देखभाल आणि कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने पत्नीकडून उत्तर मागवलं आहे.