मुंबई - बारावी नापास मुलाला पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती करण्याचे आमिष दाखवून पोलिसाने ६१ वर्षीय वृद्ध वडिलांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून तब्बल सव्वाचार लाख रुपये उकळल्याचा प्रकार डोंगरीत मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी पोलीस शिपाई अण्णासाहेब शिवमूर्ती हिप्परगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मूळचे सातारा येथील रहिवासी असलेले ६१ वर्षीय एकनाथ नवघणे हे डोंगरीच्या उमरखाडी परिसरात राहतात. मुलासाठी नोकरीच्या शोधात असताना, २०१५मध्ये एका पोलिसाच्या मार्फतच त्यांची हिप्परगेसोबत ओळख झाली.त्याने तो वरळीत पोलीस प्रशिक्षक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार, नवघणे यांचा मुलगा बारावी नापास असतानाही, त्याला पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी साहेबांना देण्यासाठी, तसेच औरंगाबाद येथून बारावी पासचे बनावट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, मैदानी आणि शारीरिक चाचणीत डमी उमेदवार बसविण्यासाठी, परीक्षा यादीमध्ये नाव येण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. अशा प्रकारे विविध कारणे सांगत त्याने तब्बल ४ लाख २० हजार रुपये उकळले.
पैसे देऊनही नोकरी मिळाली नाहीपैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने नवघणे यांना संशय आला. त्यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. मात्र, हिप्परगे नॉट रिचेबल झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, नवघणे यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली.