तिरुवनंतपूरम - रेल्वे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरुन वापरल्याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तिरुवनंतरपूरम येथील माजी एएसआय आणि सध्या कोल्लमच्या चथन्नूर येथे कार्यरत असलेले पीएसआय ज्योति सुधाकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीएसआय सुधाकर यांनी चोरीचा मोबाईल स्वत:च्या अधिकारीक कामासाठी वापरला होता. (PSI stolen mobile of railway passenger in kerala)
अरुण जेरी हे प्रवासी 18 जून 2021 रोजी रेल्वे मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी, घटनास्थळावर मृतांचे नातेवाईक ओळख परेडसाठी आले असता, त्यांचा मोबाईल आणि काही वस्तू गायब असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी पोलिसांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी, कदाचित सामान ट्रेनखाली पडले असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे, नातेवाईकांनी केरळचे डीजीपी आणि सायबर सेल पोलिसांकडे मोबाईल फोन गायब झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर, सायबर सेलने तपास केला असता, कोल्लमच्या चेथन्नूर येथे मोबाईल सध्या सक्रीय असल्याचे निदर्शनास आले. तसेच, या फोनचा वापर चेथन्नूरच्या पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधाकर यांनी केल्याचेही समोर आले.
ज्यावेळी, अरुण जेरी यांचे अपघाती निधन झाले होते, तेव्हा मंगलापूरम एसआय ज्योति सुधाकर यांच्या नेतृत्त्वात या घटनेचा तपास पूर्ण झाला होता. या तपासदरम्यानच सुधाकर यांनी हा मोबाईल चोरल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी, मोबाईल फोन सापडलाच नसल्याचे त्यांनी रेकॉर्डमध्ये दाखवले होते. ज्योति सुधाकर यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू असल्याचे तिरुवनंतपूरम रेंजच्या डीआयजींनी सांगितले आहे.