नालासोपारा : अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या बनावट काॅल सेंटरवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी छापा मारून दहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ९ लॅपटाॅप, ९ हेडफाेन हस्तगत केले आहेत.नालासाेपारा पश्चिमेतील श्रीप्रस्था विभागातील ‘यशवंत गौरव’मधील सुंदरम् प्लाझा इमारतीच्या सदनिका क्रमांक १०३ मध्ये बॅसिन एक्सपोर्ट लिमिटेड नावाने २५ दिवसांपूर्वी हे काॅल सेंटर थाटले हाेते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना या कॉल सेंटरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई विरार परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता काॅल सेंटरवर छापा मारला. या वेळी प्रकाश बॅनर्जी (वय ३४), जयेश पडाया (२४), चंदन आमीन (२४), भरत भाटी (३०), ॐकार काळे (२०), सनीत कपाडे (२०), कोमल बघाडे (१९), मुस्कान हुसेन (१९), प्रांजल शिंदे (२८), चन्द्रेश विश्राम (२४) यांना ताब्यात घेतले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
नालासाेपाऱ्यातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी मारला छापा; दहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 6:43 AM