चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याभरात आयपीएल सट्टेबाजांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान रामनगर पोलिसांनी हवेली गार्डन व ओम भवन परिसरातील विदर्भ प्लॉट ओनर्स येथील तिसऱ्या माड्यावर अशा दोन ठिकाणी रविवारी कारवाई करून तब्बल १६ लाख ३२ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पाच जणांना अटक केली. तर फरार दोघांचा तपास सुरू आहे. हवेली गार्डन परिसरातील कारवाईत रोहन प्रकाश कांबळे (२३) रा. हवेली गार्डन याला अटक केली. तर अरबाज कुरेशी रा. हवेली गार्डन हा फरार आहे. तर ओम भवनच्या बाजूला केलेल्या कारवाई आसिफ रहीम शेख (३४), रवी मोहन गंधारे (३२), दिनेश लक्ष्मण कोल्हे (३३), गणेश नंदकिशोर जानवे (२५) सर्व राहणार वरोरा हल्ली मुक्काम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर छोटू उर्फ रूपचंद यादव रा. माजरी हा फरार आहे.
आयपीएलला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक बुकी सक्रिय झाले असून, आयपीएलवर मोठा सट्टा सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. तेव्हापासून जिल्हाभरात अशा कारवाई सुरू आहेत. रविवारी रामनगर पोलिसांनी हवेली गार्डन येथे कारवाई करून रोहन कांबळे याला अटक करीत टीव्ही, गाडी, मोबाइल, सट्ट्याचे साहित्य असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर ओम भवनाच्या बाजूला विदर्भ प्लॉट ओनर्स तिसरा माढा स्वप्निल बोरकर यांच्या प्लॉट क्रमांक तीन डी येथे धाड टाकून एक लॅपटॉप, पाच मोबाइल व जुगाराचे साहित्य असा एकूण १४ लाख २२ हजार ३७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली. तर एकजण फरार आहे. ही कारवाई रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे, ठाणेदार लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनात एपीआय हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने केली.
एलसीबीची गोंडपिपरीत व रामनगर परिसरात कारवाई
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी चौकातील मारगोनवार यांच्या आटाचक्कीसमोर अभिलाश शरद मारगोनवार (२७) रा. भंगाराम तळोधी हा आयपीएल मॅचवर मोबाइलवर संभाषण व मेसेज करून क्रिकेट चालविताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत मोबाइल, नगदी रक्कम, जुगार असा एकूण २१ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर रविवारी इंदिरानगर चौकातील सिद्धू पान सेंटर ऐथे सिद्धांत माधव गोंडाने (३०) रा. राजीव गांधी नगर, चंद्रपूर याला आयपीएलवर सट्टा खेळताना अटक करून १७ हजार १०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पीएसआय अतुल कावळे, नितीन साळवे यांच्यासह पथकाने केली.