लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी, फसवणुक, बेकायदा सावकारी प्रकरणातील फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या घरावर बुधवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला़ त्याचबरोबर त्याच्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असून तेथून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत़ शहरातील ६ वेगवेगळ्या ठिकाणी हे धाड सत्र सुरु आहे़ या ठिकाणी सापडलेल्या संशयास्पद कागदपत्रे, बनावट शिक्के व इतर सामुग्रीचा पंचनामा करण्याचे काम बुधवारी सायंकाळीही सुरु होते.
रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीसह वेगवेगळ्या कलमाखाली जुलैमध्ये रवींद्र बऱ्हाटेसह चौघांविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तेव्हापासून रवींद्र बऱ्हाटे हा पसार झाला आहे़ त्याच्या शोधासाठी शहर पोलीस दलाची पथके विविध शहरात शोध घेऊन आली़ परंतु, तो कोठेही मिळाला नाही़.
बऱ्हाटे याचे शनिवार पेठेतील कार्यालय, बिबवेवाडी -कोंढवा रस्त्यावरील लुल्लानगर तसेच धनकवडीतील तळजाई पठार परिसरात घर आहे़ याचबरोबर काही नातेवाईकांच्या घरावर पहाटेपासून कारवाई सुरु केली आहे़ या घरांची झडती सुरु आहे.
बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल आहेत़ तसेच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हडपसर येथील गुन्ह्यामध्ये रवींद्र बऱ्हाटे हा टोळीप्रमुख असून तो संपूर्ण टोळी चालवत असल्याने त्यांच्यासह १३ जणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.बऱ्हाटे याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे़ त्यानंतरही तो न सापडल्याने न्यायालयाने नुकतेच बºहाटे याला फरार घोषित केले आहे.