असं म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो गुन्हा केल्यावर काहीना काही पुरावा नक्कीच सोडून जातो. अशीच एक घटना नंदुरबारमधून समोर आली आहे. इथे एका गुन्हेगाराने एका तरूणीची फारच सफाईने हत्या केली होती. मात्र, स्थानिक पोलीस आणि गुजरात सूरत पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनने तरूणीच्या मारेकऱ्याला पकडलं आहे. नंदुरबारमध्ये २६ ऑगस्ट २०२१ बिलाडी भागात २० ते २५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. खबर मिळताच नंदुरबार पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्याने तिच्या चेहऱ्यावर अनेक वार केले होते.
नंदुरबार पोलिसांसाठी ही एक ब्लाइंड मर्डर केस होती. कारण घटनास्थळाहून पोलिसांना काहीच पुरावा हाती लागला नव्हता. नंदुरबार पोलिसांनी केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला तर त्यांना सर्वातआधी पाचोराबारी भागात एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यात मृत तरूणीच्या कपड्यांसारखे कपडे घातलेली एक तरूणी दिसत होती. त्यावेळी तिच्यासोबत एक तरूणही होता.
इथूनच नंदुरबार पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिली पायरी मिळाली होती. पण केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ते शक्य नव्हतं. नंतर पोलिसांनी ढेकवत रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. पण सूरत-भुसावळ रेल्वे एक मिनिटासाठी थांबली होती.
इथे एका ऑटोतून उतरताना एक तरूण-तरूणी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. नंदुरबार पोलिसांनी एकूण २१ रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. ज्यातून समोर आलं की, हे दोघेही सूरत रेल्वे स्टेशनहून चढले होते. नंदुरबार एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितलं की, सूरतच्या अल्ट्रालाइफ स्टाइल शॉपिंग मॉलमध्ये मृत महिला आणि पकडण्यात आलेला आरोपी शॉपिंग करताना दिसले होते. त्या शॉपिंगग मॉलमध्ये सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्या आधारावर शॉपिंगचं बिल सापडलं. ज्यावर आरोपीचं नाव आणि मोबाइल नंबर होता. त्याआधारावर सूरत क्राइम ब्रांचच्या मदतीने नंदुरबार लोक क्राइम ब्रांचने आरोपी विनय कुमार रायला अटक केली.
प्रेयसीपासून लपवली विवाहित असल्याची बाब
नंदुरबारचे एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितलं मृत तरूणीचे आरोपी तरूणासोबत प्रेमसंबंध होते. पण आरोपी विवाहित आहे. ही बाब त्याने मृतक प्रेयसीपासून लपवली होती. यामुळे दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रकरण हत्येपर्यंत पोहोचलं.
महाराष्ट्र नंदुरबारमध्ये झालेल्या एका तरूणीच्या हत्येची केस नंदुरबार आणि सूरत पोलिसांनी मिळून सॉल्व्ह केली. पण मर्डरच्या आरोपीचं सरनेम वेगवेगळं सांगितलं. सूरत पोलिसांनी विनय यादव सांगितलं तर नंदुरबार पोलिसांनी विनय राय सांगितलं. इतकंच नाही तर मर्डर करण्याचं कारणही दोन्ही पोलिसांनी वेगवेगळं सांगितलं. सध्या आरोपी विनय रायला सूरत पोलिसांना अटक करून नंदुरबार पोलिसांकडे सोपवलं आहे.