पोलिसांनी गुरुग्रामची मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे 25 सदस्यीय पथक पटियाला येथे पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील टोहाना कालव्यात सापडला.
पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुग्राम गुन्हे शाखेच्या सहा टीम मृतदेहाचा शोध घेत होते. 2 जानेवारीला गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलमध्ये दिव्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंह याने ही घटना घडवली.
याप्रकरणी पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या आरोपीची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात हरियाणा पोलिसांना यश आलं. दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या टोहाना कालव्यात फेकून दिल्याचं बलराजने पोलिसांना सांगितलं होतं. खरं तर दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिल याच्याकडे सोपवली होती.
बलराज देश सोडून पळून जाण्याच्या बेतात होता. बंगालमधील विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. बलराज गिलने दिव्याचा मृतदेह त्याचा बॉस अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिकीमध्ये टाकून त्याची विल्हेवाट लावली होती. या कामात रवी बंगाने साथ दिली. अभिजीत सिंहने त्याच्या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांसह दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून बीएमडब्ल्यू कारच्या डिकीमध्ये ठेवला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं. या कामासाठी अभिजीतने त्याला 10 लाख रुपयेही दिले होते.