मुंबई - शहर व उपनगरात अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती देण्यास मुंबईपोलिसांनी नकार दिला आहे. अशा प्रकारची माहिती ‘आरटीआय’च्या कायद्यातून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुंबईत गेल्या ५ वर्षात भारतीय नसलेल्या ज्या परदेशी नागरिकांना पकडले आहे आणि परदेशी रवानगी केले, तसेच परदेशी नागरिकांना ज्या कलमाखाली अटक केली आहे, याबाबतची आकडेवारी जेष्ठ आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. मात्र, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मधील भाग-६ चे कलम २४ (१) अनुसार नोंदणी, व्हिसा आणि अन्य भारतात वास्तव्यास असलेल्यांची माहिती ही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आली असल्याचे कळविले आहे. मात्र, गलगली यांनी त्याला आक्षेप घेताना मुंबई पोलिसांनी याबाबत आपल्या परीने अर्थ लावला आहे. वास्तविक अशी माहिती स्वत:हून माहिती अधिकार कायदा २००५ चे कलम ४ अंतर्गत स्वत:हून प्रकटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.