मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून स्टंटबाजी करत असताना लोकलखाली जाता - जाता वाचलेल्या तरुणीविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या तरुणीविरोधात भारतीय रेल्वे कायदा १९८९, कलम १५६ अंतर्गत लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आला. १७ वर्षीय तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडीओ वायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या घटनेची चौकशी करायला सुरुवात केली.
धावत्या लोकलमधील दरवाज्यावर उभी राहून प्रवास करणाऱ्या तरुणीला प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान मिळाल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मंगळवारी चांगलाच व्हायरल झाला होता. याप्रकरणी दिवा आरपीएफ पोलिसांनी त्या संबंधित तरुणीविरोधात भारतीय रेल्वे अक्ट 156 नुसार गुन्हा केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. वायरल व्हिडीओनुसार, हेडफोन कानात घालून तरुणी पुरुषांच्या डब्यातुन प्रवास करताना दिसून येत आहे. तसेच वेगात धावत असलेल्या लोकलच्या दरवाज्यावर प्रवास करत होती. काही सेंकदांसाठी तरुणी लोकलच्या बाहेर डोकवली असता विरुद्ध दिशेने जोरदार वेगात लोकल आली. यावेळी तरुणीचा तोल गेल्याने ती दोन लोकलच्यामध्ये पडणार इतक्यात दरवाज्याच्या आतील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तिला पकडून लोकलमध्ये सुखरुप खेचून आणि तिचे प्राण वाचवले. त्यानंतर दुपारी ती तरुणी आणि एक तरुण दिवा रेल्वे स्थानकात उतरले. तेथील स्टेशन मास्टर कार्यालयात जाऊन प्रथमोउपचार घेतले आणि जीआरपी पोलिसांनी तिला दिव्यातील जीवदानी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तिच्या हाताला जखमी असल्याची नोंद दिव्यात झाल्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून तिच्या नातेवाइकांना यासंदर्भात नोटिस बजावण्यात आल्याची माहिती दिवा आरपीएफ अधिकारी यादव यांनी दिली.
रेल्वे कायदा १९८९ कलम १५६ अन्वये काय आहे शिक्षा ?
लोकलच्या छतावरून वा फुटबोर्डावर उभं राहून प्रवास अथवा स्टंटबाजी केल्यास रेल्वे कायदा कलम १५६ अन्वये ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५०० रुपये दंड आकारला जातो. तर कधी कधी गुन्हा केलेल्या व्यक्तीकडून दंड तर वसूल केला जातोच तर ३ महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा देखील सुनावली जाते. तसेच एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याने असे कृत्य केल्यास त्याला या शिक्षेसह नोकरीवरून बडतर्फ केले जाते.