नवी दिल्ली – शहरात एका पित्याने स्वत:च्या अडीच महिन्याच्या मुलीला विकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारीत दिल्ली महिला आयोग आणि पोलिसांनी मध्य दिल्लीच्या हौज काजी परिसरातून या चिमुकलीची सुटका केली आहे. तिला यापूर्वी अनेकांनी विकलं होतं. सर्वात आधी चिमुकलीच्या वडिलांनी एका महिलेला विकलं कारण त्याला मुलगी नकोशी होती.
वडिलांनी या चिमुकलीला ज्या महिलेकडे विकलं तिनेही या मुलीला अन्य एका महिलेला विकत दिलं. आयोगाने बुधवारी रात्री या प्रकरणाची माहिती मिळताच तात्काळ या मुलीची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याबाबत महिला आयोगाने सांगितले की, मुलीच्या वडिलांना टीमने जाफराबादला घेऊन गेले आहेत. ज्याठिकाणी त्यांनी चिमुकलीला मनिषा नावाच्या महिलेला विकलं होतं. आरोपी महिला त्याठिकाणी नव्हती. मुलीच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याला अगोदर दोन मुली होत्या, तिसरी मुलगी झाल्याने तो निराश झाला. त्यामुळे या मुलीला त्याने विकले. या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले त्यानंतर गुरुवारी सकाळी चिमुकलीला ताब्यात घेण्यात यश आलं.
तसेच पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी सांगितले की, आमच्या पथकाने दिल्लीच्या सर्व ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर हाजी कौज परिसरात ही चिमुकली सापडली. या मुलीला तिच्या आईकडे सोपवण्यात आलं आहे. तपासात समोर आलं की, चिमुकलीच्या वडिलांना अगोदरच दोन मुली होत्या. त्यांच्या दोन्ही मुली दिव्यांग आहेत. त्यांच्या उपचारासाठी तिसऱ्या मुलीला विकलं होतं. आरोपी वडिलांनी मुलीला ४० हजार रुपयांना मनिषा नावाच्या महिलेला विकलं. मनिषाने पुन्हा या चिमुकलीला संजय मित्तल नावाच्या दाम्पत्याला विकण्यात आलं. मित्तल यांना एक मुलगी हवी होती. त्यासाठी त्यांनी मनिषा हिला ८० हजार रुपये दिले होते असं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, संजय मित्तल यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपा आणि मंजू यांच्याद्वारे मनिषाला पैसे दिले होते. पोलिसांनी वडील, मंजू, मनिषा आणि संजय मित्तल यांना अटक केली आहे तर दीपाचा शोध घेतला जात आहे. या चिमुकलीला बुधवारी रात्रीपासून आम्ही शोधत होतो, त्यानंतर सुदैवाने ही चिमुकली आम्हाला सापडली असं दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले.