मुंबई - आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या २० वर्षीय तरुणीचे प्राण मुंबईपोलिसांनी प्रसंगावधान राखून वाचविले. अंधेरीच्या कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. तरुणीला आत्महत्येपासून प्ररावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलीचा जीव वाचला आणि अनर्थ टळला.
अंधेरीच्या कोलडोंगरीमध्ये राहणारी २० वर्षी श्रेया (बदलेले नाव) महाविद्यालयात शिकते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले आणि या रागातून श्रेया आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. अंधेरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे आणि सोनिया साळवी हे घटनास्थळी पोहोचले. प्रवीण जाधव यांनी श्रेया हिला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्याजवळ टाकीवर पोहोचले आणि संधी मिळताच तिला टाकीच्या कठड्यावरून आत खेचले. पोलिसांनी दाखविलेला चातुर्य आणि प्रसंगावधान यामुळे श्रेया हिचे प्राण वाचले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.