मुंबई - भायखळा रेल्वे स्थानकावरून काही दिवसांपूर्वी 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला होता. या अपहरण करणाऱ्या दोन महिलांना पकडण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. जावेला मुल होत नसल्यामुळे या दोन बायकांनी मिळून हे कृत्य केल्याची कबूली पोलिसाना दिली आहे.
भायखळा पश्चिमेला रेल्वे स्थानकावर 16 डिसेंबरला तक्रारदार महिला तिच्या मुलीसोबत बहिणीची वाट पहात होती. त्यावेळी स्थानक परिसरात फलाटवर तिच्या मोठ्या मुलीसह तीन वर्षाची दुसरी मुलगी ही खेळत होती. मात्र, ती अचानक फलाटावरून दिसेनाशी झाली. तक्रारदार महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीचा सर्व ठिकाणी शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर महिलेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी भायखळा ते कल्याण सर्व स्थानकावरील सीसीटिव्ही फूटेज तपासले. तसेच तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन बेपत्ता मुलगी ही हैद्राबाद येथे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांच्या पथकाने मुलीला ताब्यात घेत एका महिलेला अटक केली. अटक केलेल्या महिलेच्या चौकशीतून मुख्य आरोपी महिला ही पुण्यात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेला ही अटक केली. दोघींच्या चौकशीतून जावेला मुल होत नसल्यामुळे या मुलीचे अपहरण करून तिला तिच्याकडे सोपवल्याची कबूली आरोपी दोन्ही महिलांनी दिली आहे.