- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाजपच्या एका नगरसेविकेने केलेल्या लैंगिक अत्याचार आणि ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यामध्ये लूकआऊट नोटीस असल्यामुळे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना बुधवारी इमिग्रेशन विभागाने मालदीवला जाण्यापासून रोखले. त्यानंतर ठाणेपोलिसांनीही त्यांची चौकशी केली. त्यामुळे फिरायला जाण्याच्या मूडमध्ये असलेल्या मेहतांची पंचाईत झाली.
मेहता यांच्याविरुद्ध त्यांच्या एकेकाळच्या मैत्रिणीने सुमारे दीड वर्षापूर्वी मीरा रोड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलिसांकडे होता. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर हे प्रकरण ठाणे शहर पोलिसांकडे गृह विभागाने वर्ग केले. याच गुन्ह्यात मेहता यांच्याविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली होती. मेहता हे कुटुंबीयांसह २५ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी मालदीवला जाण्याच्या बेतात होते. त्यांनी परतीच्या फ्लाईटचेही तिकीट आरक्षित केले होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी आधीच काढलेल्या लूकआऊट नोटीसमुळे इमिग्रेशन विभागाने त्यांना विमानतळावरच रोखले. त्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाला देण्यात आली. त्याच आधारे ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची विमानतळावरच चौकशी केली. या चौकशीमध्ये फिरायला जाण्यासाठी परदेशी (मालदीवला) जात असल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, चौकशीला संपूर्णपणे पोलिसांना सहकार्य करणार असल्याची हमीही त्यांनी दिली. शिवाय, याच गुन्ह्यात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला असल्याने अटक न करण्याचेही न्यायालयाचे निर्देश असल्याची कागदपत्रेही पडताळण्यात आली. पोलिसांना यासंदर्भातील माहिती मेहतांनी आधीच दिली असती तर त्यांना कदाचित रोखण्यात आले नसते. आता २५ ऐवजी २६ ऑगस्टला ते पुन्हा मालदीवला जाणार असून त्यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात ॲट्राॅसिटीचा गुन्हाही रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले.