योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एमडी-गांजाच्या व्यसनातून घरफोडीकडे वळलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तीन टोळ्यांतील पाच जणांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. १५ ते १७ जूनच्या कालावधीत तुषार टोंगसे (३७, अयोध्यानगर) हे नाशिकला गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १.६१ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून आयुष आशिष लखोटे (२०, रामबाग) व आयुष अनिल फुले (१९, रामबाग) यांना ताब्यात घेतले. त्यांनी जब्बा ऊर्फ तेजस मिथुन हनवते (रामबाग), अक्षय ऊर्फ बोडा (ईमामवाडा) व रितेश ऊर्फ ददु वानखेडे (रामबाग) यांच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींनी इतवारीतील सराफा व्यापारी गोपाल जाडीया याला सोन्याचे दागिने विकल्याचे सांगितले. आरोपींनी अजनी व सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतदेखील घरफोडी केल्याची माहिती दिली. रितेश हा सध्या कारागृहात आहे. आयुष लखोटे हा सूत्रधार असून त्याला व त्याच्या साथीदारांना एमडी, गांजा आणि दारूचे व्यसन आहे. या व्यसनातूनच त्यांनी घरफोडी करण्यास सुरुवात केली. पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाई क्रमांक दोन:दुसरी कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने केली. ७ जून रोजी रात्री प्रवीण वामनराव खोदनकर (५४, गाडगेनगर) हे पुण्याला गेले असता अज्ञात चोरट्यांनी घर फोडून १.३५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता व गुन्हेशाखेकडून समांतर तपास सुरू होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अफरोज अंसारी ऊर्फ शमशाद अंसारी (२२, पारडी, भांडेवाडी), मानस सुशील भाटीया (२४, ठक्करग्राम, पाचपावली) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच वाठोड्यातील रवींद्र बोबटे व दिनेश पाटील यांच्या घरीदेखील घरफोडी केल्याचे सांगितले. आरोपींनी तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एमएच ३१ ईएच ९८२२ तसेच कळमन्यातून एमएच ३१ बीई ४२१२ या मोटारसायकलदेखील चोरल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून ३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलिस निरीक्षक राहुल शिरे, राजेश लोही, आशीषसिंह ठाकूर, प्रमोद वाघ, राजेंद्र टाकळीकर, रामचंद्र कारेमोरे, टप्पूलाल चुटे, भीमराव बांबल, राजू राठोड, गौतम रंगारी, निखिल जामगडे, सुशील श्रीवास, राजू टाकळकर, अमोल भक्ते, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी, आशिष पवार व शेखर राघोर्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाई क्रमांक तीन
तिसरी कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने केली. निर्मल विजयपाल सिंह (४२, शिवसुंदर नगर, दिघोरी) हे २५ जून रोजी उत्तर प्रदेशला गेले होते. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून ३.४४ लाखांचा मुद्देमाल गायब केला. त्यांच्या बहीण प्रतिमा सिंह यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने शेख ईरषाद शेख ईजराईल (१९, दुर्गानगर, कळमना) याला ताब्यात घेतले. त्याने मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहीर अंसारी (२४, गरीब नवाज नगर, वाठोडा), शेख साहील शेख आबीद (२०, म्हाळगी नगर, हुडकेष्वर) व प्रमोद उर्फ शुभम समुद्रे (२५, दुर्गा नगर, कळमणा) यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी मानवशक्तीनगर येथेदेखील घरफोडी केल्याची माहिती दिली. तीनही आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक रमेश ताले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.