मुंबई - मुंबई वाहतूक पोलीस विभागातील भ्रष्टाचाराबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आणि खात्यातील गैरव्यवहाराबाबत जाहीरपणे मत मांडत असलेल्या मुंबई पोलीस दलातील सहाय्यक फौजदार सुनील टोके यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बेशिस्त वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सशस्त्र पोलीस विभागाचे अप्पर आयुक्त जयकुमार यांनी मंगळवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी केले.अडीच वर्षापूर्वी मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार टोके यांनी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत वरिष्ठाकडून कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे प्रकाशझोतात आलेले टोके हे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरवर्तन, भ्रष्टाचाराबाबत उघडपणे मते मांडत होते. त्यासंबंधीची क्लिप, माहिती सोशल मिडीयावरुन वायरल करत होते. सशस्त्र पोलीस दल विभागाच्या यावर्षीच्या बदल्यांच्या गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत यावर्षी ३० मे रोजी परवानगी मागितली होती.त्याबाबतची चौकशी माटुंगा विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडून सुरु असताना टोके यांनी त्यामध्ये असहकार्य केल्याचा ठपका ठेवला. त्याचप्रमाणे एका पोलीस कर्मचाऱ्याने खाकी वर्दीत भीक मागण्याची परवानगी मागितल्याबाबतची माहिती प्रसार माध्यमाला पुरविली. वरळी येथील वाहतूक मुख्यालयातील नियुक्तीत गैरहजर राहिल्याबाबत चौकशी सुरु केली असता पत्नीसह इच्छामरणाची मागणी केली. सुरक्षा व संरक्षण व्यवस्थेत त्रुटी असल्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्याऐवजी थेट परराष्ट्र मंत्रालय, अमेरिका अध्यक्ष, दुतावासाशी संपर्क साधून पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे शेजारी राहत असलेल्याविरुद्ध खोट्या तक्रारी करुन त्यांना कायदेशीर कारवाईत गुंतविण्याची धमकी दिली, आदी कारणांमुळे खात्याची प्रतिमा मलीन करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत रोज सशस्त्र दलाच्या निरीक्षकांसमोर हजरी द्यायचे त्याचप्रमाणे शहरबाहेर जायचे असल्यास विभागातील उपायुक्तांची परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तुणूक) नियम १९७९मधील नियम ३ पोटनियम(१) अन्वये हा आदेश बजाविण्यात आला आहे.*सुनील टोके यांनी वांरवार बेशिस्त वर्तन करुन शिस्तप्रिय खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत सबळ पुरावे असल्याने प्राथमिक चौकशीला अधीन ठेवून निलंबित करण्यात आले आहे.एस.जयकुमार ( अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलीस दल मुंबई)*आपण कसलेही बेशिस्त वर्तन केलेले नसून सशस्त्र पोलीस दलातील गैरकारभाराबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी मागितल्याने सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. या अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहोत. सुनील टोके ( निलंबित सहाय्यक फौजदार)
वाहतूक पोलीस खात्यातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणारा फौजदार निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 5:34 PM
पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका; अप्पर आयुक्तांची कारवाई
ठळक मुद्दे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका; अप्पर आयुक्तांची कारवाई सशस्त्र पोलीस विभागाचे अप्पर आयुक्त जयकुमार यांनी मंगळवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी केले.बेशिस्त वर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलीन करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे