मुंबई - सरत्या वर्षाला निराेप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असताना थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. थर्टी फर्स्टच्यानिमित्ताने आज सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या एकूण ७७८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ७७८ वाहन चालकांपैकी ५७८ दुचाकी चालक तर २०० चारचाकी वाहन चालक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.
काल रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयाेजन करण्यात आले होते. दरम्यान, दारु पिऊन गाडी चालविणे कायद्याने गुन्हा असला तरी अनेकजण याचे उल्लंघन करतात. गेल्या वर्षी देखील अशा तळीरामांवर मुंबई पाेलिसांनी माेठ्या प्रमाणावर कारवाई केली हाेती. यंदा देखील ड्रंक अॅण्ड ड्राईव्हवर पाेलिसांची करडी नजर ठेवून पोलिसांनी कायदा माेडणाऱ्यांवर कारवाई केली आहे.