कल्याण - कल्याणनजीकची इराणी वस्ती गुरुवारी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पुन्हा चर्चेत आली आहे. वसई गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक सकाळी साडेदहाच्या सुमारास फसवणुकीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला पकडण्यासाठी आले होते. आरोपीला अटक करून घेऊन जात असताना इराणींच्या शेकडोच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले असून, तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अशा घटना यापूर्वीही बरेचदा घडल्या असून, येथील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वेस्थानकाला लागूनच इराणी वस्ती आहे. सोनसाखळी, दुचाकी चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील अट्टल चोरट्यांचे निवासस्थान म्हणून ही वस्ती ओळखली जाते. त्यामुळे ती नेहमीच पोलिसांच्या हिटलिस्टवर असते. या ठिकाणी पोलिसांनी अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन करून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येथे पोलिसांवर हल्ले वारंवार झाले आहेत. या वस्तीत पोलीस शिरल्यावर महिला मोठ्या संख्येने घराबाहेर येऊन प्रतिकार करतात.
इराणींकडून पोलीस पुन्हा एकदा लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 12:02 AM