अमरावती : राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० दरम्यान घडली. पोलिसांनी सावरासावर केली मात्र, त्या महिला तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या.
राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवि राणा यांच्या नेतृत्त्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ जानेवारी रोजी बसविण्यात आला होता. मात्र, तो प्रशासनाने रात्रीतून उचलल्याने राजकीय वाद विकोपाला गेला. त्याच अनुषंगाने काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिघळलेल्या स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.