इंदोर
मध्य प्रदेशच्या इंदोर येथे एका कॉलेज बाहेर विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे आणि छेड काढणाऱ्या 'मजनूंना' पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी कॉलेजच्या गेटवर विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आणि कॉलेज बाहेरूनच दोघांनी धिंड काढली. कॉलेज ते पोलीस ठाण्यापर्यंत या दोन टवळखोरांची कान पकडून पोलिसांनी धिंड काढली. इंदोर पोलिसांनी महाविद्यालयांबाहेर अशी 'मजनूगिरी' करणाऱ्यांविरोधात सुरू केलेलं अभियानाची सध्या जोरदार चर्चा आहे.
इंदोरमधील जीडीसी कॉलेज बाहेर काही टवळखोर तरुण विद्यार्थिनींची छेड काढत असल्याच्या काही तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. कॉलेजच्या बाहेर उभं राहून काही ऑटोरिक्षा चालक विद्यार्थिनींकडे पाहून अश्लिल चाळे आणि छेड काढत असल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी याची दखल घेत सिविल ड्रेसमध्ये जाऊन कॉलेजबाहेरच दोन रिक्षा चालकांना पकडलं. पोलिसांनी दोघांना सर्वांसमोर कान पकडून जोरबैठका मारण्यास सांगितल्या आणि विद्यार्थिनींची माफी मागण्यास सांगितलं. इतकंच नव्हे, दोघांची पोलिसांनी धिंड काढली. 'गुंडागर्दी पाप है', असे नारे देण्यास या दोघांना सांगितलं आणि शहरातून दोघांची धिंड काढली. पोलिसांच्या सिंघम अवताराचं नागरिकांनी कौतुक केलं. गुंडागिरी किंवा मजनूगिरी करणाऱ्यांबाबत नागरिकांच्या मनातील भीती कायमची नष्ट व्हावी यासाठीच या दोघांची धिंड काढण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं पोलिसांनी सांगितलं.