मुंबई - आखाती देशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मोहरक्या दिल्लीत असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक लवकरच रवाना होणार आहे. दरम्यान, फसवणूकीबद्दल तक्रार देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दक्षिण मुंबईतील मशिद बंदर येथील एका कार्यालयावर छापा टाकून दोघांना अटक केली आहे. अक्रम शरीफ शेख (वय ४७, चिता कॅम्प, ट्रॉम्बे) व शाबीर अकबर मास्टर उर्फ मुन्ना (५२, रा.डोंगरी ) यांना अटक करुन लाखो रुपयाच्या रोकडीसह ७९ पासपोर्टसह ३० जणांचे आखाती देशाचे व्हिसाच्या फोटोप्रिंट,रबरी शिक्के जप्त केले आहेत. त्यांचा एक साथीदार दिल्लीत असून तेथून तो व्हिसाचे बनावट पेपर बनवून मुंबईत पाठवित असे. नोकरी लावण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून प्रत्येकी ७०, ७५ हजार रुपये उकळत होते. अशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार,गुजरात, ओरिसा आदी राज्यातील शेकडो युवकांची फसवणूक केल्याचे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करणारे पथक सहाय्यक निरीक्षक अनंत शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी दिल्लीला रवाना होणार आहे. तिघांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्याकडून अनेक माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.