औरंगाबाद : नियम मोडून वाहन चालविल्याने अपघात होतात, हे माहीत असूनही निष्काळजीपणे वाहने पळविणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाईसोबतच गुन्हे नोंदविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विशेष म्हणजे यात ट्रिपलसीट दुचाकीचालक आणि राँगसाईडने वाहने पळविणारे वाहनचालक पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, जालना रस्त्यावर जडवाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बीड बायपास हा पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात आला होता. आता बायपासच्या पलीकडे नागरी वसाहती अस्तित्वात आल्याने या रस्त्यावरील रहदारीत प्रचंड वाढ झाली. परिणामी, या रस्त्यावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. आॅगस्ट महिन्यात बायपासवर वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचे मृत्यू झाले. अपघात रोखण्यासाठी बायपासवरील जडवाहतूक सकाळी आणि सायंकाळी प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी नुकताच घेतला. असे असताना आज आणखी एका जणाचा अपघातात मृत्यू झाला. सुसाट जीपचालकामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले. बायपासवर राँगसाईडने वाहने पळविणाऱ्यांमुळेही प्राणांतिक अपघाताचा धोका अधिक आहे.
गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले ट्रिपलसीट दुचाकीचालक, सुसाट आणि राँगसाईडने वाहनचालक, सिग्नल तोडून पळणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका अधिक असतो. सिग्नल तोडून पळणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. शिवाय कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही जीव धोक्यात घालावा लागतो. या कारवाईचा क ोणताही परिणाम वाहनचालकांवर होत नसल्याने अशा वाहनचालकांविरोधात भादंवि २७९ कलमानुसार गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.-डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त