लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वे स्थानकातील फलाटावर पोलीस कर्मचारी आणि काही लोकांमध्ये वाद झाला. कपड्यांची गाठोडी आणि सामानावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर याचं पर्यावसान हाणामारीत झालं.
व्हायरल व्हिडीओमध्ये लखनऊ पोलीस दलातील एक शिपाई महिलेला मारताना दिसत आहे. त्यासोबतच एक पुरुषासोबतही वाद घालत आहे. यादरम्यान महिलेनंदेखील शिपायाला चपलांनी मारहाण केली.
लखनऊ पोलीस दलातील शिपाई मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर येत आहे. शिपायानं त्याच्याकडे असलेलं सामान एका व्यक्तीला उचलायला सांगितलं. मात्र त्यानं नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. एसएचओ जीआरपींनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओ काल रात्रीचा आहे.
पोलीस शिपाई आणि एका प्रवाशातील वाद वाढत गेला. प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. वाद सोडवण्यासाठी आरपीएफमधील महिला कर्मचाऱ्यानं हस्तक्षेप केला. त्यानंतर हे प्रकरण चारबाग जीआरपी पोलीस ठाण्यात पोहोचलं. दोन्ही बाजूंनी लिखित तक्रार दिली. मात्र कायदेशीर कारवाई करू नये अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रकरण मिटलं.