चंढीगड - पंजाबमधील जालंधर-लुधीयाना मार्गावरील फगवाडा शहरात कुख्यात गुंडांनी पोलीस हवालदाराची गोळी झाडून हत्या केली. शहर पोलीस ठाण्याचे एसएचओ अमनदीप नाहर यांचा अंगरक्षक कमल बाजवा हा गँगस्टर्सचा पाठलाग करत होता. हे गँगस्टार क्रेटा गाडी पळवून घेऊन जात होते. त्यावेळी, गुंडांनी या अंरगक्षक हवालदारावर गोळ्या झाडल्या, त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गँगस्टर्संना पकडण्यासाठी नाकाबंदी केली. त्यावेळी, दोघांमध्ये चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांनी गँगस्टर्संना पकडण्यासाठी नाकाबंदी केली होती. या चकमकीत तीन गुंडांना गोळ्या लागल्या आहेत. त्यानंतर, पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. तर, या गँगमधील चौथा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या गुंडांना पायावर आणि हातावर गोळ्या लागल्या आहेत. रणबीर, विष्णू आणि कुलविंदर अशी तिन्ही जखमींची नावे आहेत. पोलिसांनी तिन्ही जखमींना फिल्लोरच्या सिव्हील रुग्णालयात भरती केलं होतं. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालंधर येथील सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, जालंदर सिव्हील रुग्णालयात गँगस्टर कुलविंदरचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चकमकीत एक गोळी त्याच्या पोटाला लागली होती. त्यामुळे, त्याचे लिव्हर डॅमेज झाले होते.
कुटुंबीयांस २ कोटी रुपयांची मदत
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करुन कुलदीप सिंग बाजवा यांना शहीद म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, पंजाब सरकारकडून १ कोटी रुपये आणि १ कोटी रुपये एचडीएफसी विम्याची रक्कम असे मिळून २ कोटी रुपये पीडित कुटुंबीयांस देण्यात येणार असल्याचे घोषणा केली. तसेच, सरकार शहीद कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचेही त्यांनी म्हटले.