लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मागील काही कालावधीपासून नागपुरात अंमली पदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: तरुण पिढी व विद्यार्थी गुन्हेगारांकडून ‘टार्गेट’ करण्यात येतात. हीच बाब लक्षात घेऊन नागपूरपोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’ सुरू केले आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी शाळा महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या आत असलेल्या साडेतीनशे पानठेल्यांवर कारवाई करण्यात आली. तर अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अगोदर अडकलेल्या ३७३ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. शाळा महाविद्यालयांच्या १०० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ व अंमली पदार्थांची विक्री करण्यास परवानगी नाही. मात्र अनेक ठिकाणी नियमांचा भंग करत पानठेले थाटण्यात आले आहेत. यातील काही पानठेले तसेच रेस्टॉरेन्ट्स, कॅफे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांची विक्री होते. यावर वचक बसावा यासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पानठेल्यांसोबतच रेस्टॉरेन्ट्स व कॅफेचीदेखील तपासणी होणार आहे. ‘कोपटा’ नियमानुसार १०० मीटरच्या आत असलेल्या पानठेला चालकांना दंड ठोठावण्यात आला. जर या पानठेल्यांमध्ये अंमली पदार्थ आढळले तर त्याला कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘ॲंटी नार्कोटिक्स सेल’
नागपूर पोलीस दलात ‘नार्को इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस दलात आता ‘ॲंटी नार्कोटिक्स सेल’ स्थापन करण्यात येणार आहे. यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचारी राहतील.
शिक्षक, पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन
शाळा-महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात पानठेला आढळला तर शिक्षक व पालकांनी थेट पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. यासाठी ९८२३००१०० व्हॉट्सअप क्रमांकदेखील राहणार आहे.