Pooja Chavan Suicide case Sanjay Rathod : गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात तापलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने लक्ष घातल्याने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. (National Commission for Women take cognizance Pooja chavan suicide case)
राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची दखल घेण्याची विनंतही करण्यात आली होती. या विनंतीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत.
रेखा शर्मा य़ांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी तपास अहवाल आयोगाला सादर करावा. यामध्ये याप्रकरणी काय कारवाई केली हे देखील असावे, असे म्हटले आहे.
पुण्यातील पूजा चव्हाणआत्महत्याप्रकरणी (Pooja Chavan Suicide case) शिवसेना चांगलीच अडचणीत आलेली आहे. सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच नाजूक प्रकरणांतील तिसरे मोठे प्रकरण घडल्याने महाविकास आघाडीही मेटाकुटीला आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कमालीचे सावध झाल्याचे दिसत आहेत. (Pooja Chavan suicide case Maharashtra)
पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.
यावर राठोड यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही. तसेच फोनवरही बोलणे झालेले नाही. याउलट मातोश्रीवरून राठोड यांना तसेच अन्य नेत्यांना या प्रकरणावर प्रसारमाध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असे आदेश गेलेले आहेत.