मानोरा : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी(Pooja Chavan Suicide Case) तपास सुरू असताना भाजपचे काही लोक विनाकारण बंजारा समाजाची बदनामी करीत आहेत. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम सरदार राठोड (रा. गुंडी) यांनी १ मार्च रोजी मानोरा पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे मानोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले.
मानोरा पोलिसांत १ मार्च रोजी दाखल केलेल्या तक्रारीत राठोड यांनी नमूद केले की, पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली, ही बाब खेदाची असून त्याचे आम्हालाही दु:ख आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे; मात्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), चित्रा वाघ (Chitra Wagh), प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar), आशिष शेलार(Ashish Shelar), सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar), प्रसाद लाड(Prasad Lad) आदी लोक बंजारा समाजाची, पूजा चव्हाणच्या कुटुंबाची बदनामी करून चारित्र्यहनन करीत आहेत. याशिवाय पोलीस तपासात अडथळा निर्माण केला जात आहे. त्यामुळे संबंधित नेते व मीडियावर कारवाई करावी; अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे आंदोलन करू, असा इशारा तक्रारीत दिला आहे. मानोरा पोलिसांनी ही तक्रार तपासात ठेवली असून, वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले आहे, असे ठाणेदार शिशिर मानकर यांनी सांगितले