रांची : आयएएस अधिकारी पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा व सीए सुमन कुमार आणि निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्यानंतर १९.३१ कोटी जप्त केले. तसेच, बेहिशेबी संपत्तीचे दस्तऐवज मिळाले आहेत. तसेच, एक डायरीही मिळाली आहे. यातून अनेक हायप्रोफाईल लोकांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या डायरीत मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या देवाण-घेवाणीची माहिती आहे. त्याशिवाय राजकीय क्षेत्रातील लोकांची आणि अधिकाऱ्यांची, पत्रकारांची नावे, मोबाइल नंबर यात आहेत. या लोकांची ईडीकडून चौकशी होऊ शकते. सिंघल यांच्याकडे सापडलेल्या दस्तऐवजानुसार जवळपास १५० कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीची माहिती समोर आली आहे. याशिवाय २० पेक्षा अधिक बनावट कंपन्यांची माहितीही मिळाली आहे.
पूजा सिंघल यांच्या ज्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या त्यात झारखंडमधील रांची येथील पंचवटी रेसिडेन्सी, लालपूरमधील हरिओम टॉवर, बरियातूचे पल्स हॉस्पिटल, पूजा सिंघल यांचे सरकारी निवासस्थान, पती अभिषेक झा यांचे निवासस्थान, सीए सुमन सिंह यांचे बूटी मोड येथील घर आदींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)