ठाणे - नौपाडा पोलीस ठाण्यात महिलांच्या विविध समस्यांच्या तक्रारीचा मंगळवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी आढावा घेतला. महिलांनी दाखल केलेल्या तक्रारींदरम्यान एका तरुणीचे बनावट फेसबुक अकाउंट सुरु करून त्यावरून अश्लील मेसेज करण्याचे प्रकरण पुढे आले. या तक्रारीबाबत अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश संबंधित पोलिसांना देण्यात आले आहेत.
नौपाडा पोलीस ठाण्यातील महिलांनी केलेल्या तक्रारीच्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासोबत पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय साळगावकर, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ चंद्रकांत जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीत महिलांनी तक्रारींबाबतची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा जाब अतिरिक्त आयुक्तांनी विचारला. दरम्यान, पोलीस ठाण्यात दाखल एका तरुणीच्या नावाने बोगस अकाऊंट उघडून अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आणि गंभीरतेने हाताळण्याचे आदेश दिले. त्यावेळी तरुणीच्या नातेवाईकांनी अश्लील पोस्टचे काढलेले फोटोही अतिरिक्त आयुक्त सत्यनाराण चौधरी यांना दाखविले.