सिमला (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील सदर ठाणे आणि जिल्हा पोलिसांच्या आयटी सेलचे प्रभारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी कुख्यात आरोपीला पकडण्यासाठी असा सापळा रचला की ज्यामुळे आरोपी स्वत:च अमृतसरहून मंडीपर्यंत आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावा राजवीर सिंग असून, तो अमृतसरमधील तरन तारन येथील रहिवासी आहे. हा युवक सोशल मीडीयावर फेक आयडी तयार करून महिला आणि मुलींना अश्लील मेसेज पाठवत असे.
मंडी येथील एका महिलेला या आरोपीने अश्लील मेसेज पाठवले तेव्हा या महिलेने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. ही तक्रार गेल्या महिन्यात आयटी अॅक्ट अन्वये दाखल झाली होती. तसेच त्याच्या तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
त्यानंतर इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी या तरुणाला पकडण्यासाठी तक्रारदारा महिलेलाच हत्यार बनवण्याचा निर्णय घेतला. या महिलेच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीला मंडी येथे येण्यास सांगितले. महिलेला भेटण्यास मिळणार या आतुरतेने सदर तरुण अमृतसर येथून मंडी येथे आला.त तेथे हा तरुण पोहोचला तेव्हा पोलिसांचे पथक त्याच्या स्वागतासाठी आधीच हजर होते.
दरम्यान, काल रात्री पोलिसांनी तरुणाला अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विवेक चैहल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, या तरुणावर पोलीस बऱ्याच दिवसांनी नजर ठेवून होते. तसेच मंडी येथे पोहोचताच त्याला अटक करण्यात आली.