मुंबई : पोर्नोग्राफीक फिल्म्सची निर्मिती करणे व अँपद्वारे ती प्रसारित करणे, या आरोपांखाली अटकेत असलेला व्यावसायिक व अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा व त्याचा तंत्रज्ञ रायन थॉर्प यांच्या जामीन अर्जावरील निकाल उच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला.
कुंद्रा पोलिसांना तपासासाठी सहकार्य करत नाही आणि त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे मुंबई क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे. तर कुंद्राच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत. कुंद्राला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. तसेच पोलिसांनी कुंद्राला अटक करण्यापूर्वी सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत नोटीस बजावणे आवश्यक आहे. ती नोटीसही पोलिसांनी बजावली नाही, असे कुंद्राच्या याचिकेत म्हटले आहे.
न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी ठोठावण्याबाबत दिलेले दोन आदेश रद्द करावेत व आपली तातडीने सुटका करण्यात यावी, असे दोन्ही आरोपींनी याचिकेत म्हटले आहे.
दोघांनाही सीआरपीसी ४१ ( ए) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. रायन थॉर्प याने नोटीस स्वीकारली तर कुंद्रा याने नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. हे दोघेही मोबाईलमधील माहिती डिलीट करताना आढळले. त्यांनी किती माहिती डिलीट केली, हे माहीत नाही. पोलीस ती परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मुख्य सरकारी वकील अरुणा पै- कामत यांनी न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाला सांगितले.
सत्र न्यायालयानेही निकाल राखून ठेवला
आणखी एका पॉर्न प्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात आपल्याला अटक करण्यात येऊ नये, यासाठी राज कुंद्रा याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावरील निकाल सत्र न्यायालयाने ७ ऑगस्टपर्यंत राखून ठेवला.