नवी दिल्ली - अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी अट केली आहे. या प्रकरणात राज कुंद्राविरोधात भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता राज कुंद्रा हा ब्रिटिश नागरिक असल्याने त्याचा त्याला फायदा होईल का? किंवा त्याच्या ब्रिटिश नागरिक असल्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (Will Raj Kundra benefit from being a British citizen? Legal experts say)
भारतीय कायद्यातील ज्या कलमांतर्गत राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये दोषी आढळल्यास राज कुंद्रा याला ५ ते ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. राज कुंद्राविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात क्राईम ब्रँचने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याच्याविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ४२०, ३४ आणि आयटी कायदा कलम ६७, ६७अ आणि अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील भादंवि कलम ४२० आणि आयटी कायदा कलम ६७ अ हे अजामिनपात्रा आहेत. त्यामध्ये सात आणि पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
राज कुंद्राला ब्रिटीश नागरिक असल्याचा फायदा होणार का, या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली हायकोर्टाच्या बार असोसिएशनचे सचिव अभिजात बल यांनी सांगितले की, राज कुंद्रा हा ब्रिटनचा नागरिक असल्याचा त्याच्या जामीन अर्जावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कारण राज कुंद्रा हा भारतीय नागरिक नसल्याने तो फरार होण्याची शक्यता असल्याचा तर्क सरकारी पक्षाकडून दिला जाऊ शकतो.
जर राज कुंद्रा हा कुठल्याही भारतीय नागरिकाप्रमाणेच असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर सर्व आरोप हे त्याचप्रमाणे चालतील. मात्र हे सर्व तपासामध्ये किती माहिती समोर आली आणि तपासादरम्यान किती पुरावे गोळा करण्यात आले, यावर अवलंबून असेल, अशी माहिती अभिजात बल यांनी दिली.