मुंबई : पार्किसन आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धाला मालीश करण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लील छायाचित्रण केले. त्यानंतर ते वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्याची धमकी देत २५ कोटींची खंडणी मागितली. अंधेरी परिसरात हा प्रकार घडला असून या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अंबोली पोलिसांनी अटक केली आहे़ पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
अंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनिल एस. नामक चित्रपट निर्मात्याने तक्रार केली होती. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील हे पार्किसन विकाराने ग्रस्त आहेत़ त्यांना मालीश घेण्याचा सल्ला डॉक्टरने दिला आहे. काही महिन्यांपूर्वी अनिल यांच्या वडिलांची ओळख माही लकी मिश्रा नावाच्या महिलेशी झाली. ती महिला थेरपिस्ट असल्याचे तिने त्यांना सांगितले. आॅक्टोबर, २०१८ मध्ये त्यांनी तिला मालीशसाठी बोलावले. त्यानुसार ती आली आणि मसाज देऊन निघून गेली. त्यानंतर जानेवारी, २०१९ मध्ये अनिल यांना मिश्राच्या मोबाइल क्रमांकावरून राहुल शुक्ला नामक इसमाचा फोन आला. मी ‘डिस्कव्हरी आॅफ क्राइम मीडिया’मधून बोलत आहे़ तुमच्या वडिलांची आक्षेपार्ह अवस्थेतील क्लिप आमच्याकडे आहे. त्याचे काय करायचे? अशी विचारणा त्याने अनिल यांच्याकडे केली.
आणि हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून २५ कोटी रुपयांची मागणीही केली. अनिल हे घाबरले आणि त्यांनी वडिलांकडे याबाबत विचारणा केली. तेव्हा असा काहीच प्रकार घडला नसल्याचे त्यांनी अनिलला सांगितले. त्यानंतर अनिल यांना सतत वेगवेगळ्या क्रमांकांवरून पैशासाठी फोन येऊ लागले. त्यांच्या दोन मित्रांनादेखील वाटाघाटी करण्यासाठी त्रास दिला जाऊ लागला़ हे प्रकरण वृत्तवाहिनीवर प्रसारित करून बदनामी करण्याचीही धमकी त्यांना दिली जाऊ लागली. यासाठी गोरेगाव, खार, अंधेरीमध्ये त्यांनी अनिल यांची भेट घेतली़ सुरुवातीला पाच लाख रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती़ अखेर अनिल यांनी याबाबत २१ फेब्रुवारी, २०१९ रोजी एक तक्रार अर्ज अंबोली पोलिसांना दिला़ पोलिसांनी या गंभीर प्रकरणी चौकशी सुरू केली.पाच लाख घेताना रंगेहाथ पकडले!अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेशाम शर्मा आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी चौकशी सुरू करत अनिलमार्फत खंडणी मागणाऱ्यांना अंधेरीच्या कॅफे कॉफी डेमध्ये भेटायला बोलावण्यास सांगितले.च्पोलिसांच्या सल्ल्यानुसार अनिलने त्यांना पैसे घेण्यास बोलावले. तेव्हा लकी मिश्रा (३२) हिच्यासह हुसेन हनीफ मकरानी (३६), रेहमान अब्दुल वाहिद शेख (४५) आणि युवराजसिंग चौहान (३०) हे त्या ठिकाणी आले. हुसेनने अनिल यांच्याकडे पाच लाख रुपये ठेवलेली प्लॅस्टिकची पिशवी खेचून घेतली आणि ती मिश्राच्या हातात दिली.च्तिने पैसे तपासून पाहिले आणि सापळा रचून बसलेल्या शर्मा यांच्या पथकाने या सर्वांना ताब्यात घेतले. त्या वेळी त्यांनी गुन्हा कबूल करत आणखी तिघे जण यात सहभागी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार या चौघांच्या मुसक्या आवळत अन्य तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.