पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या असून अग्रवाल कुटुंबाचा मुजोरपणा काही कमी झाल्याचे दिसत नाहीय. छोटा राजनशी संबंध असल्याप्रकरणी बिल्डर बाळाच्या आजोबाला चौकशीला बोलविण्यात आले होते. यावेळी अगरवालांच्या कुटुंबातील एका मस्तवाल व्यक्तीने पत्रकारांना अभद्र भाषेत बोलत धक्काबुक्की केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना फोन लावून प्रकरण मिटविण्याची धमकी दिली आहे.
याचा व्हिडीओ व्हायरल होत असून संतप्त पत्रकारांनी या व्यक्तीला चांगलाच इंगा दाखविल्याचे दिसत आहे. पुणेपोलिस आयुक्तालयात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला २००९ मधील एका गोळीबार प्रकरणात छोटा राजनशी संबंध असल्यावरून पोलीस आयुक्तांनी चौकशीला बोलविले होते. यावेळी पत्रकारांनी या आजोबाला छोटा राजनशी संबंध असल्यावरून प्रश्न विचारले. यावर आजोबाने उत्तर दिले नाही, फक्त ते आपला नातू अल्पवयीन असल्याचे वारंवार सांगत त्याचीच ढाल करत राहिले.
पोलिसांनी या आजोबाला बिल्डर विशाल अग्रवाल आणि चालकाला समोर बसवून काही प्रश्न विचारले. तेव्हा आजोबासोबत आलेल्या एका नातेवाईकाने स्वत: वकील असल्याचे सांगत पत्रकारांना उलट सुलट बोलण्यास सुरुवात केली. ''हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला की सगळे प्रकरण मिटेल. त्यांच्या नादी का लागत आहेत?'', अशा शब्दांत अरेरावी करायला लागला व पत्रकारांच्या अंगावर धावून गेला.
यावेळी संतापलेल्या पत्रकारांनी या मस्तवाल अग्रवालला चांगलाच इंगा दाखवत धक्काबुक्की केली. यावेळी काही पोलीस या मस्तवाल अग्रवालला वाचविण्यासाठी पुढे आले. यावेळी तणावाचे वातावरण बनले होते. सामनाने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
बाळाचा रॅप व्हिडीओ व्हायरल... खरा की खोटा?या अल्पवयीन आरोपीचा कथित रॅप व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. तसेच या मुलाच्या असंवेदनशीलतेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, या अल्पवयीन मुलाच्या आईने हा व्हिडीओ त्याचा नसल्याचा खुलासा केला आहे.