भंडारा : वसतीगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध शामकुंवर यांच्याविरूद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पास्काे) कायदा व विनयभंगाचा गुन्हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला. सुमेध शामकुंवर हा राष्ट्रवादीचा नेता असून गुन्हा दाखल झाला तेव्हापासून पसार आहे. विशेष म्हणजे शामकुवरच त्या वसतीगृहाचा संचालक आहे.
भंडारा येथील राजीव गांधी चौकात समाज कल्याण अंतर्गत ग्रामीण विकास संस्थेव्दारा संचालीत वसतीगृह आहे. त्या वसतीगृहात मोहाडी तालुक्यातील एका गावात विद्यार्थीनी राहते. ती काही दिवसापूर्वी आपल्या गावी गेली होती. शुक्रवारी शामकुवर यांनी विद्यार्थीनीच्या वडिलांना फोन केला. मुलीला घ्यायला आल्याचे सांगितले. वडिलांनी मोठ्या विश्वासाने शामकुवर यांच्या चारचाकी वाहनात बसवून दिले. भंडाराकडे येत असताना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव ते विहीरगाव मार्गवर एका ठिकाणी चारचाकी गाडी थांबवून तिचा विनयभंग केला. त्यानंतर ते दोघेही वसतीगृहात पोहचले. हा प्रकार तिने आपल्या मैत्रीणींना सांगितला. मैत्रीणीने त्या विद्यार्थीनीच्या वडिलांना माहिती दिली. त्यावरून रात्री वडिलांनी आंधळगाव ठाणे गाठून तक्रार दाखल केली. रात्र उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.. शामकुवर पसार असून त्याला शोधण्यासाठी पोलीसांचे पथक रवाना झाल्याची माहिती आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी दिली. पूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादीत आलेल्या शामकुवर यांच्यावर गुन्हा दाखल होताच जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.