लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टॉवरमधल्या घरात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याच स्वप्नासाठी अनेक जण आयुष्याची जमापुंजी खर्च करतात. मुलुंडमध्येही याच स्वप्नासाठी एका कुटुंबातील वृद्ध वडिलांसह दोन मुलांनी गुंतवणूक केली. घराचे अलॉटमेंट लेटरही मिळाले. हक्काच्या घरात जाण्याच्या विचारात असताना त्यापूर्वीच आपले फ्लॅट दुसऱ्यालाच विकल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. अखेर, याच घरासाठी पोलिस ठाण्याबरोबर कोर्टाची पायरी झिजविण्याची वेळ कुटुंबीयांवर ओढवली. आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर मुलुंड पोलिसांनी त्रिदेवच्या तीन संचालकांसह दलालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलुंड परिसरात राहणारे तक्रारदार रितेश यादव (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्रिदेव रिॲलिटी अँड कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेट कंपनीचे डायरेक्टर पीयूष गोसर, मेहुल गोसर, दीपक गोसर आणि दलाल नरेंद्र ठक्कर, गोवर्धन मणिक, नरेश गणात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
फ्लॅटची परस्पर विक्री एप्रिल २०१७ मध्ये फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी संचालकांना भेटताच त्यांनी, काही महिने थांबण्यास सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये बुकिंग केलेल्या फ्लॅटची दुसऱ्यांना परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत चौकशी करताच दमदाटी करत हाकलून दिल्याचे तक्रारदार रितेश यादव यांनी सांगितले.
शेकडो जणांची फसवणूक अन् दबाव गुन्हा दाखल होण्यासाठी आठ वर्षे लागली. सुरुवातीला पोलिसही गुन्हा दाखल करून घेत नव्हते. अखेर कोर्टात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला. समोरची पार्टी त्यांचा दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासारख्या शेकडो जणांची यांनी फसवणूक केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी होणे गरजेचे आहे.
- जगन्नाथ यादव फसवणूक झालेले वृद्ध
प्रकरण काय ?
- जुलै, २०१५ मध्ये यादव कुटुंबीयांनी जुन्या मालमत्ता विक्रीतून आलेल्या पैशातून नवीन फ्लॅटसाठी शोध सुरू केला.
- २०१६ मध्ये गणात्राने त्रिदेवच्या नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, कुलदीप ईशछाया इमारतीत गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार, तिन्ही संचालकांसोबत भेटीगाठी झाल्या. मुलुंडमध्ये टॉवरमध्ये घर होणार म्हणून यादन कुटुंबीयांनी १ कोटी ९१ लाख रुपये गुंतवले.
- पीयूष गोसरने त्यांचे प्रोजेक्ट प्लॅन दाखवून फ्लॅट २०६, ६०२ आणि ६०१ देण्याचे आश्वासन देत अलॉटमेंट लेटरही दिले. २०१७ पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यात येईल, अन्यथा प्रति स्क्वेअर फूट २४ हजार दराने रक्कम परत देण्यात येईल, असा करार झाला. सर्व पैसे धनादेशाद्वारे देण्यात आले.
- तिन्ही संचालकांनी ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा सांगत गुंतवणुकीस भाग पाडले. पैसे दिल्याच्या पावत्याही दिल्या. मात्र ना घर ना पैसे घर न मिळाल्याने यादव यांनी पोलिसांत धाव घेतली.