कल्याण - रेल्वेच्या मेल एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालविताना त्याने सोशल मीडीयावर व्हिडीओ टाकला. रेल्वेत नोकरी हवी असल्यास संपर्क साधा असे मेसेज टाकला. या त्याच्या मेसेजच्या आमिषाला एक जण फसला. त्याने त्याच्या पत्नीला नोकरी लावण्यासाठी २१ लाख रुपये दिले. नोकरीचे आमिष दाखवून २१ लाख रुपयाला गंडा घालणाऱ्या भामटय़ाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या भामटय़ाचे नाव उमाशंकर बर्मा असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेश येथे राहत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.
शहराच्या पूर्व भागात राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची आवश्यकता होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून जैन हे उमाशंकर बर्मा यांच्या संपर्कात आले. बर्मा याने सोशल मीडीयावर मेल एक्सप्रेस गाडीचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ टाकला होता. त्या व्हिडीओसोबत त्याने रेल्वेत नोकरी हवी असल्यास ती मिळवून दिली जाईल असा मेसेजही पोस्ट केला होता. जैन यांनी बर्माला पत्नीला नोकरी लावण्याच्या बदल्यात २१ लाख रुपये दिले. पैसे दिल्यावर बर्माच्या पत्नीला नोकरी काही लागली नाही. नोकरी लागली नसल्याने जैन यांनी बर्माकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. त्याला बर्मा प्रतिसाद देत नव्हता.
अखेरीस जैन याने बर्माला नांदिवली येथील घरी बोलावून घेतले. मात्र तो येणार असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्यास दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्ष महेंद्र देशमुख यांनी पोलीस अधिकारी हरीदास बोचरे आणि सुरेंद्र गवळी यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती. बर्मा हा जैनच्या घरी येताच पोलिसांनी बर्माला ताब्यात घेतले. त्याला अटक केली. बर्माला या कामात साथ देणारे आणखीन दोन भामटे आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. बर्मा हा मोटारमन नाही. मग त्याने मेल एक्सप्रेसचे इंजिन चालवितानाचा व्हिडीओ कसा काय काढला. त्याला हा व्हिडीओ काढण्याची अनुमती रेल्वेच्या कोणत्या व्यक्तीने दिली. पोलिसांसमोर जैन हा फिर्यादी म्हणून समोर आला असला तरी बर्मा याने अशा प्रकारे अन्य किती जणांना रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.