मुंबई : सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या फारुख बटाट्याच्या मुलासह दोघांना एनसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ड्रग्ज तस्करीतून झोपडपट्टीत सुरू असलेली आलिशान लाईफ स्टाईलही यातून उघडकीस आली आहे. यात कोट्यवधीच्या ड्रग्जसह तीन महागड्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटींना फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब हे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा करत असल्याबाबत एनसीबीला माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एनसीबीने गुरुवारी रात्री पश्चिम उपनगरात छापेमारी केली. याच छापेमारीत अंधेरीतील कासमनगरमध्ये शाहरुख खान ऊर्फ शाहरुख बुलेट याच्या घरी छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीने १ किलो ९६८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), ड्रग्जसोबत १ लाख १५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, विदेशी चलनातील इराणीयान रिअल्स, पॉलिश झलोटी, ओमानी रिअल्स, टोयोटा फॉर्च्युनर आणि ह्युंदाई अशा दोन कार आणि एक नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. तो झोपडपट्टीआड आलिशान लाईफस्टाईल जगत होता.
शाहरुख याच्या चौकशीनंतर एनसीबीने शादाब फारुखी शेख ऊर्फ शादाब बटाटा याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत ६१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि १६० ग्रॅम इफेड्रीन जप्त केले. शाहरुखवर मुंबई पोलिसांनी, तर शादाबवर ठाणे पोलिसांनी यापूर्वी कारवाई केली होती. यात तो जामिनावर बाहेर आला आहे.
बटाटा विक्रेता ते बॉलीवूड ड्रग्ज सप्लायरफारुख हा सुरुवातीला बटाट्यांची विक्री करायचा. त्यामुळे फारुख बटाटा नावाने तो प्रसिद्ध आहे. याचदरम्यान तो अंडरवर्ल्डमधील काहींच्या संपर्कात आला आणि आज तो मुंबईतील एक सर्वांत मोठा ड्रग्ज पुरवठादार बनला. मुंबईतील मोठे बार आणि मोठ्या ड्रग्ज पार्टीमध्ये तो ड्रग्ज पुरवतो. त्याची दोन्ही मुले हा ड्रग्जचा कारभार सांभाळत असल्याची माहिती समोर आली. त्यापैकी एक एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.