मुंबई - खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या अरुण गवळी टोळीतील खंडणीखोर आरोपीस सुगावाही लागू न देता २४ वर्षानंतर वरळी पोलिसांनीप्रभादेवी येथून अटक केली तो अरुण गवळीचा उजवा हात समजला जाणाऱ्या विजय तांडेल याचा हस्तक होता.
सतीश पाटील (४७) असे आरोपीचे नाव असून खंडणीचे गुन्हे त्याच्यावर वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. त्याने १९९७ साली त्यांनी व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावले होते. तेव्हापासून पाटील फरार होता. नवरात्रीउत्सावांनिमित्त पाटील प्रभादेवी येथील खाडा परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार प्रभादेवी परिसरात पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचला.
वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रवींद्र गोडसे, प्रमोद साळुंखे पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे, किरण परब, संदीप बुगडे यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत पाटील याच्या मुसक्या आवळल्या. सतीश पाटील याच्या अटकेमुळे आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.