मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईलची एनसीबीची समिती चौकशी करत आहे. या समितीमध्ये सात अधिकारी आहेत. डीडीजी एनसीबी ज्ञानेश्वर सिंह बांद्र्याच्या सीआरपीएफ गेस्ट हाऊसवर सोमवारी पोहोचले आहेत. प्रभाकर सैलची सोमवारी दुपारी 2 वाजल्यापासून कसून चौकशी करण्यात आली. तो आपल्या वकिलांसोबत तिथे गेला होता.
जवळपास सहा-सात तास त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर आज पुन्हा प्रभाकर साईलला (Prabhakar Sail) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीचे अधिकारी प्रभाकर साईलची चौकशी करणार आहेत. आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती असा आरोप साईल याने केला होता. कालच्या चौकशीतही त्याने समीर वानखेडे खंडणी उकळण्याच्या कटात सहभागी होते, अशी माहिती एनसीबीला दिली आहे. साईलचे वकील तुषार खंडारे यांच्यानुसार एनसीबी सध्या साईलचा जबाब नोंदवत आहे. क्रूझवर रेड टाकण्याचा खेळ हा केवळ पैसे उकळण्यासाठी केला गेला. यामध्ये एकटे समीर वानखेडे नाहीत, एनसीबीचे अन्य अधिकारी देखील असण्याची शक्यता आहे.
एनसीबीच्या स्पेशल टीमला आम्ही नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यांनतरच प्रभाकर चौकशीला सामोरा जाईल. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, या प्रकरणी तातडीने एफआयआर दाखल केला जावा, असे तुषार खंडारे म्हणाले. प्रभाकरमुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच यापैकी 8 कोटी रुपये हे वानखेडेंना देण्यात येणार होते, असा दावाही त्याने केला आहे.