डोंबिवली - अधिक व्याजाच्या फसव्या आकर्षणाला डोंबिवलीमधील शेकडो ग्राहक बळी पडले असून येथील मानपाडा रोडवरील प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी हा तब्बल ७ कोटी रूपये चुना लावून फरार झाला आहे. रामनगर पोलिस ठाण्यात त्याच्या विरूद्ध ८ जणांनी तक्रार दिली असून अन्य ५ जणांनी जबाब नोंदवली आहे. त्या पाच जणांचा जबाब मिळून सुमारे ७ कोटींची फसवणूक झाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंह पवार यांनी दिली.पवार म्हणाले की, रोज नवनवी माहिती त्या संदर्भात मिळत असून ज्या ग्राहकांची फसवणूक झाली आहे. अशांनी कोणताही दबाव, भय न बाळगता पोलिसांना संपर्क साधावा. जे नुकसान असेल ते सर्व तातडीने भरण्यासंदर्भात आपला पूर्ण प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावे तक्रार द्यावी, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलिसांनी स्वत:हूनच कोठारी याच्या बंद असलेल्या प्रथमेश ज्वेलर्सच्या दुकानाला फलक लावला असून त्यावर पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक दिला आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी तातडीने यावे असे स्पष्ट केले आहे. त्यानूसार आतापर्यंत २४ जणांनी फसवणूक झाल्याचे येथे सांगितले असून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.भिसीची योजना, अधिक व्याज, त्यासाठी लाखोंच्या घरात ठेवी घेणे यासह अन्य आकर्षक योजना दाखवून कोठारी याने नागरिकांना फसवले असून त्याच्यावर फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानूसार त्याच्या कुटूंबियांची कसून चौकशी करण्यात आलेली असून आता कोणालाही अटक केलेली नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले. कोठारीची पत्नी, मुलगा यांचीही चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले. जागेच्या व्यवहारांमध्ये, बांधकाम व्यवसायामध्ये त्याने पैसे गुंतवल्याचीही माहिती समोर येत असल्याने त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पवार म्हणाले.* मानपाडा रोडवरील बंद पडलेले त्याचे दुकान उघडण्यासाठी पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी परवानगी देताच तातडीने दुकान उघडून अन्य कागदपत्रे काढण्यात येणार असून त्याद्वारे काय माहिती मिळते याची तपासणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या पंधरा दिवसात कोणाकोणाची फसवणूक झालेली आहे हे शोधण्याचे काम जोमाने करण्यात येत असून त्यातून कोट्यवधींची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या ९ जणांनी तक्रार दिली त्यांच्यासह अन्य ५ जणांचीही चौकशी सुरू असून अधिकाधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.* फसवणूक करणारा फरार असलेला कोठारी हा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार तीन ते सहा महिन्यांपासूनच पळ काढणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत कोणीही पुढे न आल्याने नेमका गुन्हा कसा दाखल करायचा हा पेच पोलिसांसमोर होता. अनेक महिन्यांपासून त्याने व्याज देणे थांबवले होते, आकर्षक योजनांमधील ठेवींबाबत ग्राहकांनी विचारणा केल्यावर थातुरमातुर उत्तरे देत असल्याचीही माहिती पोलिसांना होती, परंतू तरीही पोलिसांनी तो फरार होण्याची वाट का बघितली अशी चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती.
Video : डोंबिवलीकरांना ७ कोटींचा चुना लावून प्रथमेश ज्वेलर्सचा मालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 6:37 PM