खामगाव (बुलडाणा) - एका शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून पहुरजिरा येथील ३२ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना १६ मे रोजी घडली. याप्रकरणी मृतकाची पत्नी वर्षा बोळे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी शिक्षिकेला अटक केली असून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहुरजीरा येथील प्रभुदास बोळे याने १६ मे रोजी शेतात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. दुसऱ्या दिवशी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने पतीच्या शिक्षक मैत्रिणीविरुद्ध २४ मे रोजी जलंब पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये पती प्रभुदास व शिक्षिका शीतल घाटोळ यांची ओळख होती. ती नेहमी पतीला व्हिडिओ कॉल करायची. तसेच फ्लॅट खरेदी करायला मदत करा, असा तगादा लावत होती. तसेच नेहमी घरी यायची. त्यामुळे पती-पत्नीचे वाद होत होते. फ्लॅट खरेदीसाठी पैसे मागितल्याने पती तणावात होते. दरम्यान, १६ मे रोजी घरी न परतल्याने प्रभुदास यांना फोन केला असता त्यांनी विष घेतल्याची माहिती मिळाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीने स्वतःचे व्हॉट्सऍप मेसेज पाहिले. त्यामध्ये मृत्यूला शीतल घाटोळ जबाबदार आहे. तिला सोडू नको, असे नमूद होते. तसेच पतीच्या मोबाईलमध्ये शितल घाटोळ हिचेही मॅसेज होते. यामध्ये तिने माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, विचारायला फोन स्वीच ऑफ करून अवस्था बदलणार नाही, आणखी बिघडेल, या आशयाचे मेसेज होते, असे तक्रारीत म्हटले. त्यावरून जलंब पोलिसांनी शिक्षिका शीतल घाटोळ हिच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपी शिक्षकेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर दुसऱ्या सुनावनीमध्ये तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कातखेडे करीत आहेत.